लखनौ: समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी हे जातीयवादी पक्ष असल्याचा पंतप्रधान मोदी यांनी केलेला दावा हास्यास्पद असल्याची टीका बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की आम्ही नव्हे तर मोदी हेच जातीयवादी असून त्यांचा जन्म मागास जमातीत झालेला नाही. त्यामुळे त्यांना मागास समाजाच्या वेदना समजणार नाहींत. आपण निवडणूक हरणार असल्याची त्यांना कल्पना आल्याने त्यांच्यात नैराश्य आले असून त्यातूनच ते असे बेताल आरोप करीत आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
पुन्हा पंतप्रधान पदावर विराजमान होण्याचे त्यांचे स्वप्न भंग पावणार असून भाजपही सत्तेवर येणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. मोदींचा उल्लेख त्यांनी जबरदस्तीका पिछडा असे केले आहे. जर ते मागास जातीत जन्माला आले असते तर त्यांना संघाने पंतप्रधान केले असते काय असा सवालही त्यांनी केला आहे. संघाने कल्याणसिंह यांची काय अवस्था केली आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. आपल्या ट्विटर संदेशात त्यांनी मोदींवर हा पलटवार केला आहे. आमच्या आघाडीवर टीका करण्यापेक्षा मोदींनी गुजरातच्या स्थितीकडे लक्ष द्यावे. तेथे दलितांना सन्मानाने जगता येत नाही असे त्या म्हणाल्या. दलिताला आपल्या लग्नात सुद्धा घोड्यावर बसता येत नाही अशी तेथे स्थिती आहे. गुजरातेत त्यांच्या राजवटीत दलितांवर मोठे अत्याचार झाले असल्याचा दावाही मायावती यांनी केला आहे.