प्रसाद शेटे
मेढ्यात पोलीस ग्राऊंडवर वाहनांची रेलचेल
दुर्गंधीचे साम्राज्य
पोलिस परेड ग्राउंड नजीक लावलेल्या या वाहनांमुळे या परिसरातील लोकांनि या ठिकाणी कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. तर या ग्राउंडवर एखादा कार्यक्रम झाल्यानंतर याच ठिकाणी कचरा टाकण्यात येतो परिणामी या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली याचा भूमी अभिलेक, रेकॉर्ड विभाग येथील कर्मचाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे, तर मेढा नगरपंचायतीनेसुद्धा या ठिकाणी लक्ष देऊन परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम केले पाहिजे.
मेढा – मेढा शहरातील पोलीस परेड ग्राउंडच्या आवारात गेल्या 20 वर्षांपासून अनेक बेवारस वाहने अक्षरश: धूळखात पडली आहेत. या वाहनांचे मालक सापडत नसल्याने पोलिसांसाठी ही बेवारस वाहने मोठी डोकेदुखी ठरत आहे. या वाहनांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया किचकट असल्याने वर्षांनुवर्षे पडीक असलेली ही वाहने जपून ठेवण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.
बऱ्याचदा चोरलेल्या वाहनांचे हवे असलेले काही भाग काढून घेऊन अशी वाहने रस्त्याच्या कडेला लावून चोरटे पसार होतात. काही घटनांमध्ये चोरटे अशा वाहनांचा वापर गुन्हा करण्यासाठी करतात. कारवाईदरम्यान बेवारस किंवा अपघातग्रस्त वाहने पोलीस नजीकच्या पोलीस ठाण्याच्या आवारात लावून ठेवतात. ज्यांची वाहने चोरीला जातात अशांपैकी अनेक वाहनचालक पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. वाहनांचा मूळ मालक सापडत नसल्यास पोलीस अशा वाहनांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करतात. त्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते.
प्रादेशिक परिवहन विभागाने वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहने निकाली काढण्याची कारवाई काही वर्षांपूर्वी केली होती. ही दुचाकी वाहने पोलीस परेड ग्राउंड परिसरात लावण्यात आली होती. गेल्या काही वर्षांपासून ही वाहने तेथेच पडून आहेत. वाहनांचे मूळ मालक दंड भरून वाहने ताब्यात घेतात. मात्र, अनेक वाहने ताब्यात घेण्यासाठी वाहनचालक आलेले नाहीत. त्यामुळे वाहने तेथेच पडून आहेत.
बेवारस वाहनांची विल्हेवाट परस्पर लावण्याचे अधिकार पोलिसांकडे नाहीत. न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून अशा वाहनांचा लिलाव केला जातो. त्यातून मिळणारी रक्कम शासनाकडे जमा केली जाते. रस्त्यांवर बेवारस वाहने आढळतात, अशी वाहने पोलीस ताब्यात घेतात. या वाहनांचे मूळ मालक पोलिसांपर्यंत पोहोचत नाहीत. काही वेळा तर वाहने अनेक दिवस रस्त्यावर धूळखात पडलेली असतात.
पोलिस परेड ग्राउंड वरील या वाहनांमुळे अडचण तर होतच आहे परंतु उन्हाळी सुट्टी मुळे लहान मुले याच ग्राउंड वर क्रिकेट खेळत असतात अनेकवेळा या वाहनंच्या बाजूला चेंडूची शोधाशोध करताना अनेक वेळा विषारी सापांचे दर्शन झाले आहे तर जवळच असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयातही अनेकदा अशा विषारी सापांचे दर्शन झाले आहे. हा संभाव्य धोका ओळखून या बेवारस वाहनांची विल्हेवाट लावावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होताना दिसत आहेत.