हॉंगकॉंग – बिनान्स या बिटकॉईनच्या सर्वात मोठ्या एक्सचेंजरमधून सायबर चोरट्यांनी तब्बल 4 कोटी डॉलर लंपास केल्याचे उघड झाले आहे. यामुळे बिनान्ससारख्या बिटकॉईन एक्सचेंजरमधील सुरक्षा व्यवस्थेतील मोठी त्रुटी उजेडात आल्या आहेत. या संदर्भात अधिकृत निवेदनामधून माहिती देण्यात आली आहे.
सायबर चोरट्यांनी सायबर यंत्रणेतील त्रुटीचा लाभ घेऊन 7 हजार बिटकॉईन लंपास केले आहेत. या बिटकॉईनची सध्याची किंमत 40 दशलक्ष डॉलर म्हणजेच 4 कोटी डॉलर इतके आहे. अनेक खात्यांच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी या बिटकॉईनवर डल्ला मारला आहे. बियानान्सच्या अनेक स्तरिय सुरक्षा यंत्रणांमधून ही खाती तपासली जातात. मात्र नियमित खाती असल्याचे भासवण्यासाठी अनेक खात्यांचा उपयोग या सायबर चोरीसाठी केला गेला होता. नेमक्या सुरक्षा यंत्रणेतील कोणत्या त्रुटीचा आधार घेऊन ही चोरी केली गेली, याचा व्यवस्थित आढावा घेतला जाणार आहे. मात्र त्यासाठी किमान आठवड्याभराचा कालावधी लागू शकतो असे बिनान्सने म्हटले आहे. या कालावधीमध्ये खात्यात भरणा आणि काढण्याचे सर्व व्यवहार थांबवले जाणार आहेत.