बगदाद – गेल्या वर्षभरात इराकमधील न्यायालयाने तब्बल 500 विदेशी नागरिकांना दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्याच्या आरोपावरून दोषी ठरवले आहे. इराकमधील सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ही माहिती दिली.
इराकमधील न्यायालयामध्ये इसिसमध्ये सहभागी झाल्यासंदर्भातील एकूण 514 प्रकरणांवर निकाल देण्यात आला, तर 202 आरोपींची चौकशी केली जात आहे आणि 44 जणांवर खटला चालवला जाअत आहे. अन्य 11 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, असे न्यायालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. दोषी ठरवलेल्या विदेशी नागरिकांमध्ये कोणत्या देशाचे नागरिक आहेत, याची माहिती मात्र न्यायालयाने दिली नाही.
इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी झाल्याच्या आरोपांची चौकशी सहा महिने चालते. मात्र दहशतवादी जिहादी कारवायांमध्ये प्रत्यक्ष सहभागाच्या आरोपांची चौकशी वर्षभर चालू शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. इस्लामिक स्टेटवर इराकने 2017 मध्ये पूर्ण विजय मिळवल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर इसिसमधील सहभागाबद्दल काही जणांना आजन्म कारावास, फाशी अशा वेगवेगळ्या शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत.
सिरीयाच्या ईशान्येकडील भागात इसिसच्या 1 हजार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तेथील आश्रय छावण्यांमध्ये 9 हजार विदेशी महिला आणि मुले आहेत. इराकमधील या खटल्यांवर मानवी अधिकार विषयक निरीक्षक गटाने टीका केली आहे. केवळ परिस्थितीजन्य पुरावा पाहून किंवा छळ करून मिळवलेल्या कबुली जबाबाच्या आधारे दोषी ठरवले जात असल्याचे या गटाने म्हटले आहे.