पुणे – स्वर्ण भारत पार्टीचे पुण्यातील लोकसभा उमेदवार ऍड. महेश गजेंद्रगडकर यांना विविध संस्थांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामध्ये किसानपुत्र आंदोलन, महाराष्ट्र मिलिटरी फाऊंडेशन आणि शेतकरी संघटना यासारख्या संस्थांनी आपला पाठिंबा अधिकृतरित्या जाहीर केला आहे.
पाठिंबा जाहीर करताना किसानपुत्र आंदोलनाचे समन्वयक अमर हबीब म्हणाले, भाजप किंवा कॉंग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अन्य राजकीय पक्षही त्याच धाटणीने वाटचाल करतात. म्हणून खरी गरज नवा पर्याय देण्याची आहे. स्वर्ण भारत पक्षाने पुण्यात पर्याय दिला आहे. महाराष्ट्र मिलिटरी फाऊंडेशनचे अध्यक्ष कर्नल जयंतराव चितळे म्हणाले, ऍड. गजेंद्रगडकर यांनी पाठिंब्याकरिता आमची भेट घेतली होती. माझ्या मते सध्याच्या काळात जेथे आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध नसताना आम्हाला गजेंद्रगडकरांच्या रुपात एक उत्तम पर्याय मिळाला आहे. शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट म्हणाले, शेती व्यवसायावरील सर्व बंधने हटविली पाहिजेत. या विचाराचा हा पक्ष असल्यामुळे शेतकरी संघटना, स्वर्ण भारत पक्षाचे अधिकृत उमेदवार ऍड. महेश गजेंद्रगडकर यांना सक्रिय पाठिंबा जाहीर करत आहोत.