भोर, (प्रतिनिधी) – कुपोषित मुले, मुलींचा आहार, गरोदर महिला व त्यांच्या कुटुंबीयांची माहिती तसेच इतर माहिती संकलित करण्याची जबाबदारी असलेल्या अंगणवाडी सेविकांना सरकारने मोबाईल दिले होते. मात्र, हे मोबाईल जुने झाल्याने सतत हँग होत होते.
त्यामुळे शासनाने आता स्मार्ट मोबाइल देण्याचा निर्णय घेतला. गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे व महिला व बालकल्याण अधिकारी भाऊसाहेब बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली २६७ अंगणवाडी सेविका आणि ९ पर्यवेक्षिका, असे २७६ मोबाईल संचांचे वाटप करण्यात आले आहे.
एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत प्रत्येक गावात अंगणवाड्यांचे कामकाज चालते. मोठ्या अंगणवाड्यांच्या ठिकाणी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत, तर मिनी अंगणवाडीत सेविका हे एकच पद आहे. अंगणवाडीत सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना शिकवले जाते, तसेच सेविकांकडून शासकीय अनेक कामे केली जातात.
यासाठी सेविकांना शासनाने मोबाइल दिला होता. यावर माहिती भरली जाते. बालकाचे वजन, उंची, पोषण आहार, गृहभेटी, उपस्थिती आदी प्रकारची माहिती भरण्यात येते; पण अनेक वर्षे वापरात असल्याने मोबाइल जुना होऊन वापराला अडचणी येत होत्या. अंगणवाडी सेविकांना अनेक कामेअंगणवाडी सेविकांना मुलांना शिकवणे, पोषण आहार, गर्भवती माता, बालकाचे वजन घेणे, लसीकरण आदी कामे करावी लागतात, तसेच शासनाच्या आदेशानंतर सर्वेक्षणाचीही जबाबदार असते.
यामुळे सेविकांवर सतत कामाचा ताण असतो. आता स्मार्ट मोबाइल दिल्यामुळे हा अहवाल देणे सोपे झाले आहे. अंगणवाडी सेविकांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या स्मार्ट मोबाइलमध्ये अंगणवाडी कामकाजाविषयी अॅप समाविष्ट करून देण्यात आले आहेत.
या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना काम करणे सोपे झाले आहे. .प्रत्येक गावांत अंगणवाड्या कार्यरत आहेत. भोर तालुक्यात २६७ अंगणवाडी केंद्र आहेत. आंबवडे १ व २, नेरे १ व २, नसरापूर १ व २, जोगवडी, भोंगवली अशा भोर तालुक्यातील आठ बीटमधील २६७ अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाइल वाटप करण्यात आले आहेत.
अंगणवाडी सेविकांना नवीन तंत्रज्ञानयुक्त स्मार्टफोन वितरित करण्यात आल्याने अंगणवाड्यांचे दैनंदिन कामकाज सुलभ झाले आहे. नवीन मोबईल हाताळताना काही अडचणी निर्माण होवू नये म्हणून अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या संचामुळे अंगणवाडी सेविकांना काम करणे सोपे होत असून आवश्यक माहिती सहज उपलब्ध होत आहे. – भाऊसाहेब बोरकर, बालविकास प्रकल्प अधिकारी, भोर तालुका
कुपोषित मुले, मुलींचा आहार, गरोदर महिला व त्यांच्या कुटुंबीयांची माहिती तसेच बालकाचे वजन, उंची, पोषण आहार, गृहभेटी, उपस्थिती आदी माहिती सहज भरता येत असल्याने अचूक माहिती वेळेत पोहचविणे शक्य झाले आहे. शासनाची कामे थेट ऑनलाइन होत असल्याने वेळेची बचत होत आहे. – रोहिणी शिवतरे, अंगणवाडी सेविका, उत्रौली (ता.भोर)