BSP First List | बहुजन समाज पक्षाने (बीएसपी) रविवारी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमधील 16 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. 2019 च्या निवडणुकीत पक्षाने, समाजवादी पार्टी (SP) आणि राष्ट्रीय लोक दल (RLD) यांच्या सोबत आघाडी केली होती. यंदाच्या निवडणुकांमध्ये मात्र ‘बसप’ने ‘एकला चलो ची’ भूमिका घेतली आहे.
जाहीर करण्यात आलेल्या 16 उमेदवारांमध्ये, सहारनपूरमधून माझिद अली, कैरानामधून श्रीपाल सिंग, मुझफ्फरनगरमधून दारा सिंग प्रजापती, बिजनौरमधून विजेंद्र सिंग, नगीनामधून सुरेंद्र पाल सिंग, मुरादाबादमधून मोहम्मद इरफान सैफी, रामपूरमधून जीशान खान, संभलमधून शौकत अली, अमरोहा येथून मुजाहिद हुसेन यांना उमेदवारी दिली आहे.
मेरठ येथून देवव्रत त्यागी, बागपत येथून प्रवीण बन्सल, गौतम बुद्ध नगर येथून राजेंद्र सिंह सोलंकी, बुलंदशहर येथून गिरीशचंद्र जाटव, ओनला येथून आबिद अली, पीलीभीत येथून अनिश अहमद खान उर्फ फूल बाबू आणि शाहजहांपूर येथून दोद्रम वर्मा यांचीही नावे 16 उमेदवारांच्या यादीमध्ये आहेत.
आज घोषित केलेल्या लोकसभा मतदारसंघांपैकी, 2019 मध्ये बहुजन समाज पक्षाने नऊ, समाजवादी पक्षाने पाच तर आरएलडीने दोन जागा लढवल्या होत्या. यापैकी सहारनपूर, बिजनौर, नगीना आणि अमरोहा या चार जागांवर बसपच्या उमेदवारांनी बाजी मारली होती. सपाने लढवलेल्या पाचपैकी तीन जागा जिंकल्या तर आरएलडीला एकाही जागेवर यश मिळालं नाही.
सात मुस्लिम उमेदवार | BSP First List |
BSP ने 16 पैकी 7 जागांवर मुस्लिम उमेदवार उभे करत समाजवादी पक्ष – काँग्रेस आघाडीसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. सपा व काँग्रेस दोघेही इंडिया आघाडीचा भाग असून उत्तरप्रदेशात भाजपविरोधी मते एकत्र करून ती आपल्या पारड्यात पाडून घेण्याची त्यांची रणनीती आहे.
पक्षाने सहारनपूर, मुरादाबाद, रामपूर, संभल, अमरोहा, ओनला आणि पिलीभीत येथे उमेदवारांची घोषणा केली असून दलित व मुस्लिम बहुल असलेल्या या जागांवर बसपने अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना संधी दिली आहे.
दुसरीकडे, काँग्रेस आणि सपानेही या जागांवर मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. बसपाचे माजी नेते इम्रान मसूद आणि दानिश अली (बसप निलंबित) यांना अनुक्रमे सहारनपूर आणि अमरोहा येथून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे, तर सपाने झिया उर रहमान बारक आणि इक्रा हसन यांना संभल आणि कैराना येथून उमेदवारी दिली आहे.
नव्या चेहऱ्यांना संधी | BSP First List |
बहुजन समाज पक्षाने 2019 मध्ये लढलेल्या, सर्व नऊ मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलले आहेत. यामध्ये चार विद्यमान खासदारांचा देखील समावेश आहे. सहारनपूरमध्ये हाजी फझल उर रहमान यांच्या जागी माजिद अलीयांची निवड केली आहे. ते ओबीसी मुस्लिम समाजाचे असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत.
अमरोहामध्ये, दानिश अली यांच्या जागी मुजाहिद हुसियन यांना उमेदवारी दिली आहे. ते एक व्यापारी असून त्यांच्या पत्नी डासना नगर पंचायतच्या अध्यक्ष आहेत.
नगीना लोकसभेचे खासदार गिरीश चंद्र जाटव यांना बुलंदशहर येथून उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या जागी सुरेंदर पाल सिंग यांना तिकीट देण्यात आले आहे. बिजनौरमध्ये विद्यमान खासदार मलूक नगर यांनी खासदारकीचे तिकीट नाकारल्याने त्यांच्या जागी विजेंदर सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे. ( BSP First List )