मुंबई – छोट्या आणि मध्यम कंपन्यांच्या शेअरचे भाव सध्या आवश्यकतेपेक्षा जास्त उच्च पातळीवर असल्याचे बोलले जात आहे. त्यातच बाजार नियंत्रक सेबीने पुन्हा या संदर्भात गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. सेबीच्या अध्यक्षा मधाबी पुरी बुच (SEBI Chairperson Madhabi Puri Buch) यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले की स्मॉल आणि मिडकॅप शेअरमध्ये काही ठिकाणी बुडबुडे आल्याचे दिसत आहे.
या ठिकाणी आवश्यकतेपेक्षा जास्त उत्साह असल्याचेही सेबीला आढळून आले आहे. या शेअरच्या किमती कृत्रिमरीत्या वाढविल्या जात असल्याची शक्यता बाजारात व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी जास्त सावध राहण्याची गरज असल्याचे यांनी सांगितले. गेल्या आठवड्यातही त्यांनी गुंतवणूकदारांना अशा प्रकारची सूचना केली होती.
त्या म्हणाल्या की, 28 मार्चपासून टी अधिक शून्य ही पद्धत शेअर बाजारात वापरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. गेल्या काही महिन्यापासून छोट्या कंपन्यांच्या शेअरचे भाव आवश्यकतेपेक्षा जास्त वाढत असल्याचे बोलले जात आहे. या बाबीकडे त्यांचे लक्ष वेधले असता बुच म्हणाल्या की या ठिकाणी काही प्रमाणात अयोग्य पद्धतीने शेअरचे भाव वाढविले जात असल्याचे दिसून येत आहे.
हे बुडबुडे कायम राहू नयेत यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. कारण हे बुडबुडे फुटल्यानंतर त्याचा गुंतवणूकदारांना त्रास होऊ शकतो. छोट्या कंपन्यांचे ताळेबंद आणि त्यांच्या शेअरचे भाव व्यस्त प्रमाणात दिसत आहेत आणि हे गुंतवणूकदारांच दृष्टिकोनातून योग्य वाटत नाही.
जानेवारी 2023 पासून छोट्या कंपन्यांच्या शेअरचे भाव आवश्यकतेपेक्षा जास्त वाढत असल्याची भावना निर्माण झाली असून काही फंडानी या क्षेत्रात गुंतवणूक करणे कमी केले आहे. या शेअरच्या किमती कृत्रीमरित्या कमी- जास्त केल्या जात आहेत, त्याचा पुरावा सेबीकडे आहे. त्याचबरोबर हा प्रकार आयपीओसंदर्भात आणि सेकंडरी ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीमध्येही होत असल्याचेही सांगितले जाते.
त्या म्हणाल्या की, सेबीची आपल्या पद्धतीने या संदर्भात चौकशी चालू आहे.
योग्य वेळेत यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाहीक केली जाऊ शकते. गुंतवणूकदारांनी छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावाबाबत जास्त संवेदनाशील राहण्याची गरज आहे. कारण हा प्रकार मोठ्या कंपन्यांच्या शेअर पेक्षा वेगळा असतो. छोट्या कंपन्याकडून शेअर बाजारासाठी आवश्यक ती माहिती जारी करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी सेबी प्रयत्न करीत आहे असे त्या म्हणाल्या.