Ajit Pawar And Supriya Sule| पुण्यात महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी हीलिंग हॉस्पिटलच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे यांचे भाषण झाले. त्यावेळी त्यांनी रखडलेल्या पालिका निवडणुकांचा मुद्दा उपस्थित केला. यावर लगेचच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
पालिका निवडणुकांबाबत सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. “माझी राज्य सरकारकडे मागणी आहे. इथे अनेक दिवस नगरसेवक नाहीयेत. गेल्या दोन-अडीच वर्षांत इथे निवडणूक न झाल्यामुळे या भागातल्या जनतेनं कुणाकडे प्रश्न मांडावेत? हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.”
“सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी नगरसेवकाची भूमिका फार महत्त्वाची असते. त्यामुळे नगरसेवकांची निवडणूक आपण लवकरात लवकर घेतली, तर या भागातल्या लोकांना मोठा आधार मिळेल”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यानंतर भाषणासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरुवातीला मान्यवरांचे आभार मानल्यानंतर लागलीच सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर प्रत्युत्तर दिलं.
अजित पवार यांचे प्रयुत्तर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य सरकारमुळे नाही तर सर्वोच्च न्यायालयामुळे थांबल्या असल्याचे यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केले. “दोन वर्षांपेक्षा जास्त काळ महानगर पालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. पण त्या सर्वोच्च न्यायालयामुळे थांबल्या आहेत. आम्हीही लोकांमधून निवडून आलेले कार्यकर्ते आहोत.”
“वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी असं आम्हालाही वाटतं. पण सर्वोच्च न्यायालयात ओबीसी यासंदर्भातला एक मुद्दा गेला असल्याने त्याचा निकाल लवकर लागत नाही. राज्य सरकार सातत्याने त्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याची तारीख लागावी आणि लवकरात लवकर या निवडणुका व्हाव्यात याच मताचं महायुतीचं सरकार आहे याची कृपया नोंद आपण सर्व सहकाऱ्यांनी घ्यावी”, असे प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिले.
दरम्यान, आजच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी अबोला धरल्याचे पाहायले मिळाले.
काही दिवसांपूर्वी नमो रोजगार मेळाव्यात निमित्त शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच मंचावर उपस्थित होते. मात्र त्याहीवेळेस अजित पवार आणि सुप्रिया सुळे या बहिण-भावांनी एकमेकांकडे बघणं देखील टाळलं होतं.
हेही वाचा:
बहीण-भावाचा अबोला कायम! सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ मागणीवर अजित पवारांचे भाषणातून प्रत्युत्तर