पिंपरी, (प्रतिनिधी) – अतिक्रमण कारवाईत कर्मचार्याने ताब्यात घेतलेली फोर्क लिफ्ट मशिन पाच महिने उशिरा जमा केल्याचे प्रकरण सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांना चांगलेच महागात पडले आहे.
याप्रकरणी कामकाजावर प्रभावी नियंत्रण नसल्याचा ठपका ठेवत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी बोदडे यांना सक्त ताकीद दिली आहे. कार्यालयीन कर्तव्य पार पाडताना, कामकाज करताना पर्यवेक्षकीय कामकाजात अथवा कर्तव्य पालनात कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा सिंह यांनी दिला आहे.
अण्णा बोदडे हे क्षेत्रीय अधिकारी असून, त्यांच्याकडे क क्षेत्रीय कार्यालयाचा कार्यभारआहे. या क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने 25 मार्च 2023 रोजी केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईत भोसरी एमआयडीसीमधील संकेत हॉटेलमागील कंपीसमोर बंद अवस्थेत असलेल्या 5 फोर्क लिफ्ट मशिनवर अतिक्रमण विषयक कारवाई करून, त्या हस्तगत केल्या होत्या. त्यानुसार या मशिन मोशी येथील वाहनतळाच्याठिकाणी जमा करणे आवश्यक होते.
या कारवाईतील कनिष्ठ अभियंता संतोष शिरसाठ यांनी या मशिन जमा केल्या नाहीत. मात्र, दरम्यानच्या कालावधीत याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर जवळपास पाच महिने विलंबाने 27 ऑगस्ट 2023 रोजी हे मशिन अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा केल्याचे दिसून आले.
या काकाजावर नियंत्रित अधिकारी म्हणून बोदडे यांची जबाबदारी असताना, त्यांनी पर्यवेक्षकीय कामकाजात कसूर केल्याने त्यांना 17 नोव्हेंबर 2023 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2023 रोजी बोदडे यांनी आपला लेखी खुलासा महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना सादर केला. हा खुलासा मान्य करण्याची बोदडे यांनी विनंती केली होती.
या खुलाशातील बाबी व शिथिल पर्यवेक्षण विचारात घेता, एक वेळ संधी म्हणून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 56(2)(अ)अर्थांतर्गंत तरतुदीनुसार बोदडे यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच कार्यालयीन कर्तव्य पार पाडताना, कामकाज करताना पर्यवेक्षकीय कामकाजात अथवा कर्तव्य पालनात कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.