संजय कडू
पुणे – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंतरराष्टीय ड्रग रॅकेट उधवस्त केल्यावर त्याचा मुख्य सूत्रधार ब्रिटनचा नागरिक संदीप धुनिया नेपाळमार्गे परदेशात फरार झाला. त्याच्या शोधार्थ पोलिसांनी लूक आउट आणि रेड कॉर्नर नोटीस काढली. मात्र, दरम्यानच्या तपासात ड्रग रॅकेटमध्ये आणखी दोन मुख्य सूत्रधार निष्पन्न झाले आहेत. हे दोघे मुख्य सूत्रधारही परदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहेत. यामुळे त्या दोघांविरुद्धही पुणे पोलिसांनी तातडीने लूक आऊट कॉर्नर नोटीस शनिवारी जारी केली.
गुन्हे शाखेने पुण्यात विश्रांतवाडी, सांगलीत-कुपवाड आणि दिल्लीमध्ये छापे टाकून तब्बल ३ हजार ६०० कोटी रुपयांचे मेफेड्राने जप्त केले. याचे धागेदोरे परदेशापर्यंंत गेल्याचेही निष्पन्न झाले. दरम्यान, रॅकेटचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया हा हाय प्रोफाइल गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर ब्रिटनमध्येही गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे ड्रगसंदर्भात असल्याची शक्यता आहे. त्याचे वास्तव्य पाटणा (बिहार) आणि महाराष्ट्रात अधिक होते.
तो महाराष्ट्र, बिहार, नेपाळ आणि ब्रिटन अशा ठिकाणी सातत्याने फिरत राहून ड्रगचे रॅकेट चालवायचा. पुणे पोलिसांची कारवाई होण्याच्या दोन दिवस अगोदरच तो नेपाळला पोहचला होता. कारवाईची कुणकुण लागल्यावर तो तेथून परदेशात गेला. मात्र, तो आखाती देशांत गेल्याची माहिती चुकीची असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्याच्यासोबत इतर तिघांकडे ड्रग रॅकेटची सूत्रे असल्याचे लक्षात येताच दोघांचाही शोध घेण्यात येत आहेत.
यातील एक आरोपी मुंबई -पुणे या शहरांतून रॅकेटची जबाबदारी सांभाळत होता. येथून तो दिल्लीला माल पाठवत होता. हे मेफेड्रोन दिल्लीहून कुरिअरद्वारे ब्रिटनला जाणार होते. मात्र, या आरोपीच्या मुलाचे लग्न असल्याने त्याने कुरिअर पाठवण्यास उशीर केला. यामुळे पुणे पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागू शकले. आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटच्या या तीन सूत्रधारांचा पुणे पोलीस कसून शोध घेत आहेत.
सर्व शक्यतांचा तपास
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पोलीस आयुक्तालयात येऊन गुन्ह्याची माहिती घेतली. त्यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले. तसेच हा गुन्हा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे वर्ग करावा, असा आग्रहही धरला. दरम्यान, संबंधित गुन्ह्यात अंडरवर्ल्ड आणि दहशतवादाचा काही संबंध आहे का, हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए) तपासत आहेत.