पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – पुण्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास वेगाने होत आहे. विविध प्रकारच्या उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा येथे असून नवीन उद्योगांसाठी चांगली संधी असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे वितरण तसेच देशातील २४ तज्ज्ञ संस्थासोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करार पुण्यात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योगविकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अपर उद्योग आयुक्त प्रकाश वायचळ, अपर उद्योग संचालक संजय कोरबु, उद्योग सह संचालक शैलेश रजपूत आदी उपस्थित होते.
उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, पुण्याची क्षमता राज्यासह देशाला कळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यापुढे अशाप्रकारचा ‘उद्योजकांचा मेळा’ प्रत्येक जिल्ह्यात भरविण्यात येईल, यामुळे त्या जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण तयार होईल, विविध उद्योजक आकर्षित होऊन तेथील उद्योगामध्ये वाढ होईल, उद्योजकांनी महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखविला असून आज सुमारे ४ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे ५ हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतील.