पुणे – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठीची मतदान ३१ जानेवारी रोजी पार पडणार आहे. त्याअनुषंगाने उमेद्वारांकडून भेटवस्तूसह विविध गोष्टींचे आमिष दाखवून मतदारांना आकर्षित होण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे.
लोकशाहीला अनुरूप आणि पारदर्शी निवडणूका पार पडण्यासाठी वकीलवर्गाने भेटवस्तू नाकारत मतदानप्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष अॅड. जयश्री चौधरी-बिडकर यांनी केले. भेटवस्तू नाकारल्यास निवडणुकीतील पारदर्शकता वाढेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
मकर संक्रांतीच्या अनुषंगाने उमेद्वारांकडून हळदी-कुंकूच्या पार्श्वभूमीवर विविध समारंभाचे आयोजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये, पर्स, साडी, पाऊच, फोल्डर आदी वाटप करून मतदार वकीलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होणार असल्याच्या चर्चा न्यायालयात आहे. याखेरीज, विविध पार्ट्यांच्या आयोजनामुळे बार असोसिएशनची निवडणुक पैशांवर चालते असा समज जनमाणसात पसरत असून बारची प्रतिमा खराब होत आहे. त्यामुळे, उमेद्वारांच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असेही अॅड. चौधरी बीडकर यांनी नमूद केले