नगर – एक जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदारयाद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारयादीच्या अंतिम प्रसिध्दी दिनांकामध्ये बदल करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार मंगळवार (दि.२३) रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांनी दिली आहे.
याबाबत जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात उपजिल्हा निवडणूक अधिकारी पाटील यांनी सांगितले आहे की, भारत निवडणूक आयोगाने (दि.१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदारयादीची प्रसिध्दी येत्या सोमवार, दि. २२ जानेवारी २०२४ रोजी करणेत येणार होती.
तथापि राज्य शासनाच्या (दि.१९) रोजीच्या अधिसूचनेनुसार परक्राम्य संलेख अधिनियमाअन्वये सोमवारी (दि.२२) रोजी श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यास्तव (दि.१ जानेवारी ) या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदारयाद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारयादीची अंतिम प्रसिध्दी मंगळवारी (दि.२३ जानेवारी) रोजी करणेबाबत भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यानुसार दि.१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदारयाद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रमांतर्गत नगर जिल्हयामध्ये मतदारयादीची अंतिम प्रसिध्दी मंगळवारी (दि.२३ जानेवारी ) रोजी करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांनी दिली आहे.