Zagreb Open 2024 Wrestling : क्रोएशियामधील झाग्रेब ओपन 2024 कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या 86 किलो वजनी गटात ऑलिंपियन दीपक पुनिया आणि यश तुशीर(74 किलो) यांनीही स्पर्धा केली, परंतु दोन्ही कुस्तीपटू पदक जिंकण्यापासून वंचित राहिले.
पुरुषांच्या 86 किलो वजनी गटात स्पर्धक असलेल्या दीपक पुनियाला पात्रता फेरीत कझाकस्तानच्या अजमत दौलेटबेकोव्हकडून 6-2 असा पराभव पत्करावा लागला. दौलेटबेकोव्हने अंतिम फेरीत धडक मारली असून दीपक पुनियाला रेपेचेजद्वारे कांस्यपदक जिंकण्याची संधी मिळाली होती. पुनियाने दोन रिपेचेज फेरींपैकी एका फेरीत युक्रेनच्या व्हॅलेंटीन बाबीचा 4-1 असा पराभव केला, परंतु जॉर्जियाच्या इव्हसेम शेवेलिड्झकडून 4-1 अशा पराभवामुळे त्याच्या पदकाच्या आशा संपुष्टात आल्या.
तर दुसरीकडे सोमवारी पुरुषांच्या 74 किलो गटाच्या 16 च्या फेरीत यश तुशीरला यूएसएच्या क्विन्सीकडून 15-4 असा पराभव पत्करावा लागला आणि तो रिपेचेजमध्ये प्रवेश करू न शकल्याने पदकापादसून वंचित राहिला.
दरम्यान, याच स्पर्धेत विद्यमान आशियाई चॅम्पियन अमन सेहरावतने क्रोएशियामध्ये बुधवारी झाग्रेब ओपन 2024 कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. भारतीय कुस्तीपटूने पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना च्या झू वानहाओचा तांत्रिक श्रेष्ठतेने (10-0) पराभव करून रँकिंग मालिकेच्या या आवृत्तीत भारतासाठी पहिले पदक जिंकले. गेल्या वर्षी अमन सेहरावतने झाग्रेब ओपनमध्ये कांस्यपदक जिंकले होते.