French Open 2024 : पहिल्याच फेरीत सुमित नागलला पराभवाचा धक्का….

French Open 2024 : भारताचा स्टार टेनिसपटू सुमित नागलला वर्षातील दुसऱ्या ग्रँडस्लॅममध्ये छाप पाडता आली नाही आणि त्याला फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. नागलचा रशियाच्या कॅरेन खाचानोव्हने पराभव केला. यासह त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
जागतिक क्रमवारीत 95व्या क्रमांकावर असलेल्या नागलकडे खाचानोव्हच्या दमदार सर्व्हिस आणि शानदार फटक्यांचे उत्तर नव्हते. तिसऱ्या सेटमध्ये तो निश्चितच शानदार खेळला पण असे असतानाही त्याला 2-6, 0-6, 6-7 (5-7) असे पराभूत व्हावे लागले. दरम्यान, नागलने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जागतिक क्रमवारीत 31व्या स्थानी असलेल्या अलेक्झांडर बुब्लिकचा पराभव करून आश्चर्यचकित केले होते, परंतु त्याला लाल मातीच्या कोर्टवर त्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही.
Russia’s Karen Khachanov knocks Sumit Nagal out of French Open with a 6-2 6-0 7-6 (5) win in the men’s singles opening round. #rolandgarros pic.twitter.com/AfwIBw3pNi
— Press Trust of India (@PTI_News) May 27, 2024
भारतीय खेळाडूने चांगली सुरुवात केली पण खाचानोव्हने तिसऱ्या गेममध्येच नागलची सर्व्हिस तोडली. यानंतर पावसामुळे 21 मिनिटे खेळ थांबवण्यात आला. खेळ सुरू झाल्यावर रशियन खेळाडूने जबरदस्त खेळ दाखवत नागलला हरवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. खाचानोव्हने दोन्ही बाजूंनी फटके मारले आणि अशा स्थितीत भारतीय खेळाडूला गुण मिळवणे कठीण झाले होते.
पहिल्या सेटच्या सातव्या गेममध्ये एका वेळी नागल 30-0 ने आघाडीवर होता पण खाचानोव्हने सलग चार गुण मिळवून दुसरा ब्रेक पॉइंट घेतला. त्यानंतर रशियाच्या खेळाडूने पुढच्या गेममध्ये फोरहँड विनर मारत पहिला सेट जिंकला. नागलला दुसऱ्या सेटमध्ये चांगली सुरुवात हवी होती पण पहिल्या गेममध्येच त्याने सर्व्हिस गमावली. यानंतर भारतीय खेळाडूलाही दोनदा ब्रेक पॉइंट घेण्याची संधी मिळाली होती, पण खाचानोव्हने दोन्ही वेळी चांगले पुनरागमन केले. यानंतर नागलला त्याच्या पुढील दोन सर्व्हिसचा बचाव करता आला नाही आणि खाचानोव्हने हा सेट सहज जिंकला.
नागलने तिसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करत पहिली सर्व्हिस वाचवली पण तिसऱ्या गेममध्ये त्याला तसे करता आले नाही. दरम्यान, नागलने दुसऱ्या गेममध्ये खाचानोव्हची सर्व्हिस तोडण्याच्या दोन संधी गमावल्या. रशियाच्या खेळाडूने त्याच्या सर्व्हिसवर गुण मिळवून 3-1 अशी आघाडी घेतली. भारतीय खेळाडूने 10व्या गेममध्ये खाचानोव्हची सर्व्हिस मोडून 5-5 अशी बरोबरी साधून आशा निर्माण केली होती. हा सेट टायब्रेकरपर्यंत लांबला ज्यामध्ये नागल एका वेळी 5-3 ने आघाडीवर होता पण त्याने दुहेरी चूक (डबल फाल्ट) करून खाचानोव्हला पुनरागमनाची संधी दिली आणि रशियन खेळाडूने वेळ न दडवता सेट आणि सामना जिंकण्यात यश मिळवले.





