Team India Head Coach : भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी पंतप्रधान मोदी अन् गृहमंत्री शाह यांचे अर्ज? जाणून घ्या, काय आहे नेमंक प्रकरण…

Team India Head Coach : भारतीय क्रिकेट संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक कोण असेल या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते. मात्र त्याची मुदत 27 मे रोजीच संपली आहे. मात्र नवीन प्रशिक्षक अद्याप समोर आलेला नाही. दरम्यान, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका अहवालानुसार, मुख्य प्रशिक्षकासाठी 3000 हून अधिक अर्ज आले होते. यातील बहुतांश अर्ज बनावट होते. यासंदर्भात धक्कादायक बातमी समोर आली आहे.
इंडियन एक्स्प्रेसमधील एका बातमीनुसार, बीसीसीआयकडे मुख्य प्रशिक्षकपदासाठी 3000 हून अधिक अर्ज आले आहेत. यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, (PM Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावे देऊन अर्ज आले आहेत. मात्र हे सर्व अर्ज बनावट (फेक) आहेत. बीसीसीआयने अर्जासाठी गुगल फॉर्म शेअर केला होता. मात्र, ही बाब उघडकीस येताच त्यानंतर काही वेळातच हा फॉर्म हटविण्यात आला होता.
या अहवालानुसार बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या वर्षीही बीसीसीआयला अशाच गोष्टींना सामोरे जावे लागले होते आणि यावेळीही अशाच गोष्टी घडल्या आहेत. बीसीसीआयने गुगल फॉर्मद्वारे अर्ज मागवले जेणेकरून उमेदवारांची निवड करणे सोपे जाईल. मात्र, असे प्रकरण उघडकीस आल्याने बीसीसीआयचे काम वाढले आहे कारण त्यांना आता यातून योग्य अर्ज निवडायचे आहेत.
टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहेत. ते सध्या त्यांची दुसरी टर्म करत आहेत. मात्र आता त्यांनी ते पुढे नेण्यास नकार दिला आहे. 2024 च्या टी20 विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे यानंतर जबाबदारी कोणाला मिळणार, हे अद्याप समोर आलेले नाही. द्रविडच्या कार्यकाळात टीम इंडियाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. टीम इंडिया 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. येथे संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी अनेक माजी खेळाडूंची नावे चर्चेत होती. त्यात ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पॉन्टिंगचे नाव पुढे आले होते. पण मुख्य प्रशिक्षकासाठी बोर्डाने कोणत्याही ऑस्ट्रेलियनशी चर्चा केलेली नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. गंभीर हा आयपीएल 2024 च्या मोसमातील विजयी संघ कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) मार्गदर्शक होता. मात्र, त्यांनीही याबाबत मौन बाळगले आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार बोर्डाच्या एका सूत्राने म्हटले आहे की, वेळ मर्यादा ठीक आहे परंतु निर्णय घेण्यापूर्वी बोर्डाला आणखी काही वेळ लागू शकतो. सध्या संघ टी-20 विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त आहे. यानंतर वरिष्ठ खेळाडूंना श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर विश्रांती देण्यात येणार असून एनसीएचे वरिष्ठ प्रशिक्षक संघासोबत राहू शकतात. अशा स्थितीत घाई कशाची?





