पिंपरी – राज्यात काही ठिकाणी करोनाच्या जेएन १ या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क आवश्य वापरावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील अधिका-यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कोरोना संक्रमणाच्या काळात मास्क वापरणे बंधनकारक केले होते. करोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतर नागरिकांनी मास्क वापरणे बंद केले होते. त्यातच आता पुन्हा राज्याच्या काही भागात कोरोनाचा जेएन १ व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरणे गरजेचे आहे. मात्र, शहरात अद्याप करोना जेएन १ व्हेरिएंटचा विषाणू आढळला नाही.
तरीदेखील गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे गरजेचे आहे. कारण, शहरात जेएन १ व्हेरिएंटचा रुग्ण आढळला नसला तरी, ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सक्रीय आहेत. मागील महिन्यात ३० कोरोना रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती वैद्यकीय विभागाने जाहीर केली आहे. तरीही, मेट्रो-रेल्वे स्थानक, बाजारपेठा, बसस्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी नागरिक विनामास्क वावरत असल्याचे चित्र आहे.
जंतुसंसर्ग टाळण्यासाठी काळजी घ्या
शहरात जेएन १ कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तरी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा. आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. रुग्णाला सर्दी किंवा खोकला झाल्यास मास्कचा वापर करावा. यामुळे जंतुसंसर्ग टाळता येतो. वारंवार तोंडाला किंवा डोळ्यांना स्पर्श करू नये. योग्य आहार घेणे गरजेचे आहे, असे आवाहन वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी केले आहे.