चौकशी अहवाल सात दिवसांत सादर करा : साखर आयुक्तालय संचालकांचे प्रादेशिक सहसंचालकांना आदेश
शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संपूर्ण संचालक मंडळाच्या आर्थिक व्यवहारांची व बॅंक खात्यांची चौकशी त्याबाबतचा अहवाल सात दिवसांत सादर करा, असे आदेश साखर आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणेचे संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना दिले आहे.
शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर हजारो शेतकरी अवलंबून आहेत. अद्याप कारखाना बंद असल्याने नुकतीच भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी साखर आयुक्त चंद्रकात पुलकुंडवार यांची भेट घेत निवेदन देऊन कारखान्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार झाल्यामुळे कारखाना आर्थिक संकटात सापडला असल्याचा आरोप केला.
माजी चेअरमन यांच्या खासगी कारखान्याचे हित जोपासण्यासाठी कारखाना बंद पाडण्याचा कट रचण्यात येत आहे का, याची चौकशी करावी, साखर आयुक्तांनी चेअरमन व संचालक मंडळांची चौकशी करत संचालक मंडळ बरखास्त करून कारखाना ताब्यात घेऊन तात्काळ प्रशासक नेमून कारखाना सुरु करावा, संचालक मंडळांच्या आर्थिक व्यवहारांची व संपत्तीची चौकशी करावी,
शासनाशी पत्र व्यवहार करुन कारखाना कायमस्वरूपी वाचविण्यासाठी निर्णय घ्यावा या मागणीसाठी (दि.२७) डिसेंबरपासून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे समोर धरणे व आंदोलन सुरु करणार असल्याबाबतचे निवेदन संजय पाचंगे यांनी दिले होते. त्यानुसार घोडगंगा कारखान्याच्या संपूर्ण संचालक मंडळाच्या आर्थिक व्यवहारांची व बॅंक खात्यांची तसेच पाचंगे यांनी केलेल्या बाबींची चौकशी करुन त्याबाबतचा अहवाल सात दिवसांत सादर करावा, असे आदेश साखर आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणेचे संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना दिले आहे.