वडगाव मावळ – ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी, निवृत्तिवेतन व इतर प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मावळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून तीन दिवस काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचे कामकाज विस्कळित झाले असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे अध्यक्ष गणेश वाळुंजकर, उपाध्यक्ष जीवन गायकवाड, सचिव सुखदेव गोपाळे, खजिनदार राजेंद्र कांबळे, राजेंद्र वाघोले, योगीराज भालेकर, कैलास मुन्हे, मारुती घरदाळे आदीनी पंचायत समिती कक्ष अधिकाऱ्यांची भेट घेऊन काम बंद आंदोलनाचे निवेदन दिले. विकासाचा महत्वाचा भाग असूनही ग्रामपातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या सातत्याने प्रलंबित ठेवल्या जात आहेत.
याबाबत आंदोलन, मोर्चा, मेळावे करूनही अद्यापपर्यंत कुठलीही मागणी मंजूर झालेली नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध लागू करावा व नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी.
ग्रामपंचायत शिपाई यांना आठवड्यातून तीन दिवस जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वच्छतागृह साफ करणे व सफाई काम करण्यासाठी चुकीचा आदेश देण्यात आला आहे. त्यास कर्मचारी संघाचा तीव्र विरोध आहे. हा आदेश त्वरित रह करण्यात यावा, आदी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या असून, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.