पुणे : महावितरणकडून थकीत वीजबिलांच्या वसूलीला मोठा वेग देण्यात आला आहे. यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात ८ लाख ५२ हजार ग्राहकांकडे २३० कोटी २१ लाख रुपये वीजबिलांची थकबाकी आहे.
पुणे प्रादेशिक विभागात सद्यस्थितीत १८ लाख २ हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांकडे ३७६ कोटी ६७ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. महावितरणच्या महसूलाचा आर्थिक स्त्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसूली हाच आहे. मात्र चालू महिन्याचे वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महावितरणच्या थकबाकीदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. थकबाकी तसेच चालू महिन्याचे वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.
वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याच्या कटू कारवाईला वेग देण्यात आला आहे. आता एका महिन्याचे वीजबिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.