वरवंड/ पारगाव – मराठा आरक्षणासाठी सरकारला दि. 24 डिसेंबरचा अल्टीमेट दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रभर तिसऱ्या टप्यात दौरा सुरू केला असून दि. 15 नोव्हेंबरपासून याची सुरुवात आहे.
त्या अनुषंगाने गुरुवार (दि.16) रोजी दौंड तालुक्यातील वरवंड येथे बाजार मैदान या ठिकाणी सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. त्यासाठी दौंड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नियोजन बैठकीसाठी शेकडो मराठा कार्यकर्ते वरवंड तेथे जमले होते. यावेळी सभेसाठी पुणे बाजूने येणाऱ्या वाहनांना गोपीनाथ मंदिर, नागनाथ विद्यालय, कै. एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालय या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे.
पूर्वेच्या बाजूने येणाऱ्या वाहनांसाठी कवठीचा मळा, शिवानी शोरूमपर्यंत दोन्ही बाजूला वाहने लावण्याची व्यवस्था केली आहे. शिरूर बाजूने येणारी वाहने ही विठ्ठल मंदिर परिसरात लावली जातील, अशी माहिती समन्वय समितीने दिली. ग्रामस्थांच्या वतीने सर्वांसाठी अल्पोपहार ठेवण्यात येणार आहे. वरवंडच्या पुणे व सोलापूर या दोन्ही बाजूस ही व्यवस्था असेल तसेच बोरीपार्धी ग्रामस्थ शौचालय पुरवणार आहेत.
अनेक गावांनी वेगवेगळ्या प्रकारे मदत जाहीर केली आहे. सभेसाठी जिल्ह्यातून 1 लाख मराठा समाज येणार आहे. 500 मराठा स्वयंसेवक उपलब्ध असणार आहेत. यावेळी सभेपूर्वी आंतरवली सराटी या ठिकाणी पोवाडा सादर केलेले शिवशाहीर अरविंद घोगरे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे.
सभा संपल्यानंतर महिला, वृद्ध, लहान बालकांना बाहेर पडण्यास मदत करावी व त्यानंतर सभा मैदान साफसफाई केली जाईल, मान्यवर ते सर्वसामान्यांसाठी पूर्ण बैठक व्यवस्था ही भारतीय बैठक या स्वरूपात आहे. पूर्वेकडून सभेसाठी येणाऱ्या वाहनांना पाटस टोलनाक्यावर टोलमाफी दिली आहे. मराठा बांधवांनी तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन दौंड सकल मराठा समाज समन्वय
समितीने केले आहे.
आठवडा बाजार गुरूवारी रद्द
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जरांगे यांचा दौऱ्याचा हा तिसरा टप्पा असून या पार्श्वभूमीवर गुरूवार (दि. 16) वरवंड येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे. त्यामुळे गुरुवार असलेला नियमित आठवडे बाजार रद्द करण्यात आल्याची माहिती वरवंड गावच्या सरपंच मीनाक्षी दिवेकर यांनी दिली आहे. रद्द झालेला आठवडे बाजार, शनिवारी भरविण्यात येणार आहे, याची सर्व शेतकरी, व्यापारी व ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे.