पिंपरी – दिवाळीचा आनंद प्रत्येकजण आपल्यापरीने साजरा करीत असतो. प्रकाशाच्या या उत्सवाला सामाजिक बांधिलकीचे कोंदण देण्याचा प्रयत्न करत, मोशी-चिखली व किवळे-रावेत येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या वतीने मावळातील सोमवडीवाडी, कातकर वस्ती व गोळेवाडी आंबी येथील कलाश्रम प्रकल्पातील कातकरी आदिवासी व निराधार मुलांसोबत दिपावली सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना स्टेशनरी तर आदिवासी महिलांना फराळाचे वाटप करण्यात आले. यामुळे समाजातील या उपेक्षित घटकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते.
गेल्या चार वर्षांपासून संस्थेच्या वतीने अशा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळी उत्सवा दरम्यान मुलांना शैक्षणिक साहित्य, बॅग, टिफिन बॉक्स यासह फराळ, कपडे, फटाके तसेच आदिवासी कातकरी नागरिकांना विविध गृहोपयोगी वस्तूं कपडे आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुलभूत गरजांसाठी धडपडणाऱ्या आदिवासींच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले.
इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मनोगतात सांगितले की, आई-वडिलांकडे हट्ट करून हवी ती गोष्ट मागण्यासाठी आम्ही भांडत असतो. परंतु, कमीत-कमी गोष्टींपासून देखील आनंद मिळतो, हे आज पहायला मिळाले.
यावेळी इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कुलच्या संस्थापक संचालिका कमला बिष्ट, संचालक डॉ. संजय सिंग, डॉ. अजित थिटे, प्रचितीचे संचालक प्रशांत पाटील, विजय शिर्के, प्राचार्या दिपाली तनपुरे, रवी पोटफोडे आदी उपस्थित होते.