Rahul Narvekar : आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना फटकारत दिलेल्या आदेशांची जोरदार चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात होताना दिसून येत आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधारी आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासंदर्भात आणि विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना राहुल नार्वेकर आज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळले.
राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकणात चालढकल करत असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना शिवसेनेसंदर्भात ३१ डिसेंबर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविषयी ३१ जानेवारी पर्यंत निर्णय घेण्याचे अंतिम आदेश दिले आहेत. यावरूनच उद्धव ठाकरेंनी “राहुल नार्वेकर म्हणतात त्यांना आदेशाची प्रत प्राप्त झालेली नाही. मी शिवसेनेच्या आमदारांना सांगेन की त्यांनी ही प्रत राहुल नार्वेकरांना नेऊन द्यावी”, असा खोचक टोला लगावला होता. दरम्यान, यावर बोलताना आपल्यावरील आरोप हे दबाव टाकण्याचा प्रकार असल्याचं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.
पुढे त्यांनी “ज्यावेळी मला या आदेशासंदर्भात विचारलं गेलं, तेव्हा माझ्याकडे त्या आदेशाची प्रत नव्हती. ती संध्याकाळी अपलोड झाली. आता उद्धव ठाकरेंना ही प्रत आधी मिळाली असेल, तर त्याबद्दल तुम्ही त्यांनाच विचारा. आता उद्या सुनावणी असेल तेव्हा पुढील कार्यवाहीबाबत माहिती दिली जाईल”, असे स्पष्ट केले आहे.
त्यासोबतच “विधानसभा अध्यक्षांबद्दल बेजबाबदार टीका करण्यामागे एक मोडस ऑपरेंडी आहे. विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणून आपल्याला हवा तसा निर्णय करून घेणं हा यामागचा हेतू आहे. पण मी अशा दबावाला बळी पडत नाही. त्यामुळे ज्यांना हा प्रयत्न करायचा आहे त्यांनी करावा”, अशा शब्दांत राहुल नार्वेकरांनी विरोधकांना सुनावलं आहे.
त्यासोबतच “सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर संध्याकाळी ७ नंतर ती वेबसाईटवर अपलोड झाली. त्यानंतर ती मला मिळाली. त्यावरून अशा कमेंट्स केल्या जात आहेत. त्यांना जर आदेशाची प्रत इतरांपेक्षा आधी मिळाली असेल, तर त्यांनी तो खुलासा करावा. हेतुपुरस्सर केली जाणारी टीका म्हणजे फक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे”, असेही नार्वेकर म्हणाले.