पुणे – अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी भूसंपादन विषयात महापालिकेला मोठे यश मिळाले आहे. कोंढवा येथील टिळेकरनगर ते खडीमशीन चौक रस्त्यासाठी उद्योजक प्रकाश धारिवाल यांनी “टीडीआर’च्या बदल्यात कुठल्याही अटींशिवाय जागा देण्याची तयारी दर्शवली. एवढेच नव्हे, तर त्यांनी रस्त्याचे काम सुरू करण्याचीही परवानगी दिली. त्यामुळे महापालिकेने सोमवारीच येथील जमीन लेव्हलिंगचे काम हाती घेतले.
याबाबत मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी माहिती दिली. राज्य सरकारने कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी 200 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली आहे. भूसंपादनाअभावी या रस्त्याचे काम प्रलंबित असून वाहतूक कोंडी, अपघातांमुळे येथील समस्या गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर भूसंपादनासाठी जागा मालकांशी मनपा प्रशासन सातत्याने संपर्क साधत आहे. त्यातील अनेकांनी जमीन देण्याची तयारी दर्शविली आहे.
दरम्यान, कात्रज चौक ते कोंढवा येथील खडी मशीन चौकादरम्यान रस्त्यासाठी लागणारी सर्वात मोठी जागा ही उद्योजक प्रकाश धारिवाल यांच्या मालकीची आहे. त्यांच्या सुमारे 60 गुंठे जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली. यावर धारिवाल यांनी कुठल्याही अटी, शर्ती न ठेवता तातडीने ही जागा देण्याची तयारी दर्शविली. एवढेच नव्हे, महापालिकेने या जागेचा तडजोडीने ताबा घेण्याची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून तातडीने कामही सुरू केले आहे, अशी माहिती ढाकणे यांनी दिली.
ताब्यात आलेल्या जागेवर रस्त्यावर सुरूवातीला लेव्हलिंग करून मुरूम टाकून कान्हा हॉटेल चौक ते खडीमशीन चौक या रस्त्याला पर्यायी मार्ग वापरासाठी तयार करण्यात येईल. यावरून जड वाहतूक सुरू करून जुन्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल. यामुळे या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मदत होणार आहे, असेही ढाकणे यांनी यावेळी सांगितले