गोविंद जाधव : साडेचार हजार नागरिकांनी केले श्रमदान
मंचर – स्वच्छता ही सेवा पंधरवड्यानिमित्त मंचर (ता. आंबेगाव) नगरपंचायतीच्या पुढाकाराने मंचर शहरात विविध ठिकाणी श्रमदान करण्यासाठी नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, डॉक्टर संघटनांनी, स्वयंसेवी संघटनांनी सहभाग नोंदवला. सुमारे साडेचार हजार नागरिक ांनी सहभाग नोंदवून श्रमदान केले. यावेळी तीन टन कचरा गोळा करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली.
मंचर शहरात श्रमदान कार्यक्रम 13 ठिकाणी राबवले गेले. अभियानात मंचर नगरपंचायतीचे कर्मचारी, मुख्याधिकारी, तसेच सर्व शाळा-महाविद्यालयाचे शिक्षक, प्राध्यापक, नागरिक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात मंचर शहरात साडेचार हजार नागरिकांनी सहभाग नोंदवून श्रमदान केले.
तीन टन कचरा यावेळी काढण्यात आला आणि मंचर नगरपंचायतीचे दोन ट्रॅक्टरमार्फत हा कचरा प्रक्रिया केंद्रावर वाहून नेण्यात आला. त्याचबरोबर आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत मंचर उपजिल्हा रुग्णालय येथे, तर पोलीस ठाणे आणि मंचर नगरपंचायत यांनी संयुक्तपणे मंचर बस स्थानक येथे श्रमदान केले.
अभियानात डॉ. सीमा खिंवसरा, डॉ. मोहन साळी सहभागी झाले होते. हे श्रमदान महात्मा गांधी हायस्कूल गेटपासून सुरू होऊन अनेक ठिकाणी श्रमदान करत इंडियन ऑइल पेट्रोल पंप पुणे नाशिक हायवे येथे समाप्त करण्यात आले, अशी माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली.