पुणे – कुख्यात अमली पदार्थ उत्पादक आणि तस्कर ललित पाटील याच्यासारखे आणखी सात कैदी ससूनमध्ये उपचाराच्या नावाखाली चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी दाखल आहेत. यामध्ये एक माजी आमदार आणि कुख्यात मारणे टोळीच्या गुंडाचा समावेश आहे. ससून रुग्णालयात कैद्यांना अधिक काळ ठेवण्यामध्ये “अर्थ’कारण असल्याचा संशय व्यक्त होत आहे. ललित पाटील हा सोमवारी ससून रुग्णालयातून पळाला.
तो शिक्षा भोगत असलेल्या अडीच वर्षांतील तब्बल 16 महिने ससून रुग्णालयात दाखल होता. पाटील याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुन्हा पाठवण्यासाठी येरवडा कारागृहाने ससून रुग्णालयास चार वेळा लेखी पत्र देऊनही त्याला कारागृहात पाठवण्यात आले नाही, अशीही माहिती समोर आली आहे. ललित पाटील ससून रुग्णालयातून ड्रग रॅकेट चालवत होता. सव्वादोन कोटी रुपयांच्या अमली पदार्थाचे पार्सल त्याने रुग्णालयातून साथीदाराकडे पाठवल्याचेही उघड झाले.
या प्रश्नांची हवीत उत्तरे
- ड्रग्जचे पार्सल ललित पाटील याला कोणी दिले?
- ललित याचे साथीदार कोण?
- पैसे घेऊन त्याला कोण आश्रय देत होते?
- सव्वादोन लाखांचे दोन आय-फोन कोणी दिले?
- ललित याला रुग्णालयात अधिक काळ आश्रय देण्यात कोण अधिकारी, कर्मचारी सहभागी आहेत?
तब्बल दोन तास माहिती लपवली
बंदोबस्तावरील पोलिसांनी तब्बल दोन तास वरिष्ठांना, नियंत्रण कक्षाला तसेच जवळील बंडगार्डन पोलिसांना ललित पळून गेल्याची कल्पना दिली नव्हती. तो सापडणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.