मुंबई – करोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना यांना हायकोर्टाने पुढील चार आठवडे अटकेपासून दिलासा दिला आहे. मात्र या दरम्यान चौकशीला हजेरी लावत त्यांना मुंबई पोलिसांना तपासांत पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार 11, 13 आणि 16 सप्टेंबर रोजी किशोरी पेडणेकरांना मुंबई पोलीस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीकरता हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान त्यांना अटक झाल्यास 30 हजारांच्या जामीनावर त्यांची तात्काळ सुटका करण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत.
मुंबई सत्र न्यायालयाने याप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या अर्जावर न्यायमूर्ती निझामुद्दीन जमादार यांच्यापुढे सुनावणी झाली. करोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत मृतदेह ठेवण्यासाठीच्या बॉडीबॅगमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने किरीट सोमय्यांच्या तक्रारीवरून पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी पेडणेकरांच्या याचिकेला विरोध करताना पोलिसांनी, “अधिकार नसतानाही महापौरांनी आपल्या बंगल्यावर बोलावून समितीला संबंधित कंपनीला कंत्राट देण्यास भाग पाडल्याची माहिती असल्याचे’, स्पष्ट केल्याचे समजते.