पुणे – पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाकडे नवीन ईव्हीएम मशीन सुपूर्द केल्या आहेत. बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट अशी एकूण 33 हजार मशीन जिल्हा प्रशासनाकडे आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून या मशीनची प्राथमिक तपासणी नुकतीच पूर्ण करण्यात आली. या तपासणीमध्ये ईव्हीएम मशीन सुस्थितीत असल्याची खातरजमा करण्यात आली आहे.
एप्रिल 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात पुणे लोकसभा मतदारसंघ, बारामती, शिरुर आणि मावळ मतदारसंघाचा समावेश होतो. अवघ्या काही महिन्यांवर या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. जिल्ह्यात सुमारे 7 हजार 915 मतदान केंद्र आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यासाठी बॅलेट युनिट 8 हजार, कंट्रोल युनिट 8 हजार आणि व्हीव्हीपॅट 17 हजार अशा एकूण 33 हजार मशीन दिल्या आहेत, असे प्रशासनाने सांगितले.
कोरेगाव पार्क येथील खाद्य गोदामामध्ये या मशीनची प्राथमिक तपासणीचे काम मागील 15 दिवसांपासून सुरू होते. हे काम आता पूर्ण झाले आहे. या तपासणीवेळी भेल कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. प्राथमिक तपासणीमध्ये मशीन वापरण्यायोग्य आहे का, याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मशीनची फर्स्ट लेव्हल तपासणी केली. यामध्ये मशीनमध्ये मतदान करूनही पाहण्यात आले. यावेळी बहुतेक मशीन या चांगल्या कार्यरत असल्याचे दिसून आले. मशीनमध्ये बिघाड असण्याचे प्रमाण अगदी नगण्य
असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मशीनची चौथी आवृत्ती…
निवडणुकीसाठी महत्त्वाचे असलेले ईव्हीएम मशीन केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. या मशीन नवीन आहेत. मतदान यंत्रातील ही चौथी आवृत्ती असून या मशीन वजनाने हलक्या आहेत. या यंत्रांच्या मॉकपोलसाठी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते, त्यांनी प्रत्यक्ष मतदान करून पाहिले मशिन व्यवस्थित असल्याची खात्री केली.