मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात रखडलेले खाते वाटप अखेर आज पार पडले. अजित पवार आपल्या आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर खाते वाटपाचा तिढा वाढला होता. अखेर आज खाते वाटप करण्यात आले. तत्पूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भविष्यात अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात असे भाकीत वर्तवले आहे.
अजित पवारांना अर्थ खात नाही तर मुख्यमंत्री पद मिळणार, अजित पवार हे भविष्यात मुख्यमंत्री होऊ शकतात. हे मी वारंवार सांगतोय आणि हे मी जेव्हा सांगतो तेव्हा अनेकदा ते घडत असत. असं संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याबाबत भाष्य केले.
जेव्हा आम्ही काही सांगतो तेव्हा काही संकेत आमच्याकडे असतात असं राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीबदल अटळ आहे असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.
अजित पवार शिंदे फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सामील झाल्यापासून ते मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील याबाबत भाष्य केलं होत. अजित पवार यांच्याकडे आता अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासह काही मंत्र्यांमध्ये खाते पालाट देखील करण्यात आले आहे.