पुणे – पुणे शहरात मागील काही दिवसांत घडलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शुक्रवारी रात्री शहरात ऑल आऊट ऑपरेशन राबवले. यामध्ये खुद्द पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी रस्त्यावर उतरून कारवाईची पाहणी केली. या ऑपरेशन दरम्यान 129 कारवायांमध्ये तब्बल 165 गुन्हेगारांना अटक करण्यात आली.
या वेळी कोंम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची झाडाझडती करत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. हॉटेल, लॉजेस, धाबे, बस स्थानके, रेल्वे स्थानके तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळलेल्या संशयित व्यक्तींची कसून तपासणी करण्यात आली. गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यांची पथके कारवाईसाठी तयार करण्यात आली होती. तर वाहतूक शाखेकडून 1,822 संशयित वाहनांची तपासणी करुन 568 वाहनांवर कारवाई करुन 4 लाख 63 हजार 50 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
आरोपींच्या तपासणी अभियानात 1994 गुन्हेगारांचा माग काढण्यात आला, त्यापैकी 695 गुन्हेगार मिळून आले. यातील 24 जणांना आर्म ऍक्टनुसार अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि 23 धारदार हत्यारे हस्तगत करण्यात आली. गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमध्ये मपोका 145 कायद्याप्रमाणे एकास अटक करण्यात आले. अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी दोघांना अटक करुन गांजा आणि अफिम, असे 1 लाख 75 हजार रुपयांचे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. गुन्हे शाखेने 14 आणि पोलीस ठाण्याने 159 केसेस करून 85 लाखाची गावठी दारु जप्त केली.
55 आरोपींना अटक करुन सुमारे 60 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, उप आयुक्त संदीप सिंह गिल्ल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
विमानतळ पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ऋतिक गौतम अवधूत (19,रा. संजयपार्क झोपडपट्टी विमाननगर) याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी कारवाई केली आहे. पुढील एक वर्षासाठी त्याची रवानगी अमरावती मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
आयुक्त, सह आयुक्तांनी रात्र जागून काढली
पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वत: ऑल आऊट ऑपरेशन (कोम्बिंग) मध्ये सहभाग घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन केले. त्यांनी इतर कर्मचाऱ्यांसोबत रात्र जागून काढली.