मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवार यांनीही दावा सांगितला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा सामना सध्या राज्यात सुरु आहे. या सगळ्यामध्ये आता छगन भुजबळ यांचे एक महत्त्वाचे विधान समोर आले आहे. शरद पवार यांनी भेटायला बोलावलं तर मी भेटून येईन असे म्हटले आहे. त्यासवबतच दोन-चार आमदार वगळले तर सगळे आमच्याच बाजूने आहेत असा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे.
सध्याच्या वातावरणावर बोलताना “दोन-चार आमदार वगळले तर सगळे आमच्याच बरोबर आहेत. कार्यकर्तेही आमच्याच बाजूने आहेत. अजित पवारांना किती प्रतिसाद मिळतो आहे तुम्ही बघू शकता.” असंही भुजबळ म्हणाले. त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की काही आमदार हे सिल्वर ओकवर जात आहेत. त्यावर भुजबळ म्हणाले, “त्यात काय साहेबांनी बोलावलं तर जातात. मला बोलावलं तर मी पण जाऊन भेटून येईन. मला बोलावलं तर मीपण जाऊन भेटून येईन. ” असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.
छगन भुजबळ यांनी परवाही हे म्हटले होते की, शरद पवार हे आम्हा सगळ्यांचे गुरु आहेत. त्यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. आज जेव्हा त्यांना हे विचारण्यात आलं की अजित पवार यांच्यावर अन्याय झाला आहे का? त्यावर छगन भुजबळ म्हणाले बाकी सगळ्या गोष्टी स्टेजवर बोलू. असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली आहे ती अभूतपूर्व आहे. आमच्याकडे ४० पेक्षा जास्त आमदार आहेत असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी काल केला आहे. त्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या बैठका मुंबईत पार पडत आहेत. सकाळपासूनच अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. तर सिल्वर ओक या बंगल्यावरही काही कार्यकर्ते पोहचले आहेत.