ज्याचा त्याचा अधिकार- अजित पवार
बारामती/ जळोची – प्रकाश आंबेडकर वरिष्ठ आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातील आहेत. माजी खासदार आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तींने त्याच्या सद्सद्विवेबुद्धीला स्मरूण काय करावे, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मात्र, शिवप्रेमींना हे योग्य वाटत नाही. त्यांच्या या कृतीमुळे शिवप्रेमी नाराज आहेत, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. ते तिथे का गेले हे प्रकाश आंबेडकर स्पष्टपणे सांगू शकतील, अशी पुष्टी त्यांनी यावेळी जोडली.
बारामती येथे विकासकामांचा आढावा तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पवार हे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली. याबाबत माध्यमांनी अजित पवार यांना छेडले होते. पवार म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आले. याचे सर्वसामान्य बारामतीकर तसेच लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सुद्धा स्वागतच केले. मात्र, अहिल्यादेवी होळकर यांचे नाव महाविद्यालयाला देत असताना त्यामध्ये कोठेतरी बारामतीचा उल्लेख असावा, अशी भावना अनेकांनी मला बोलून दाखवली आहे. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा मला मनापासून आनंदच आहे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
नामांतरात बारामतीचा उल्लेख असावा
पवार म्हणाले, बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायाभरणीपासून आजपर्यंतच्या कामाचा मी साक्षीदार आहे. वैद्यकिय महाविद्यालयाच्या निधीसाठी मी काय केले, हे माझे मला माहिती. ते माझे कर्तव्य होते. त्या कर्तव्य भावनेने मी केले. आता तेथे अहिल्यादेवी यांचे नाव दिले आहे. पुणे विद्यापीठाला देखील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नाव दिले आहे. आता येथे अहिल्यादेवी होळकर बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव ते देणार का, आणखी कसे देणार, हे मला माहिती नाही. शासकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव द्यावेच मात्र त्यामध्ये कुठेतरी बारामतीचा उल्लेख असावा, अशी काही बारामतीकरांनी मला विनंती केली आहे. हा अधिकार राज्य शासनाचा आहे.