पुणे – स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून वन परीक्षेत्र अधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणीचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी आढळला आहे. तिच्या शरीराचे जंगली श्वापदांनी लचके तोडले आहेत. ही तरुणी 12 जूनपासून बेपत्ता होती. यासंदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. हा खुनाचा का अपघाताचा प्रकार आहे? याची चाचपणी पोलीस करत आहेत. याप्रकरणामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांमध्ये खळबळ माजली आहे.
दर्शना पवार (26, रा. कोपरगाव, अहमदनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. दर्शना पवार पुणे शहरात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वास्तव्यास होती. ती वन परीक्षेत्र अधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असल्याने अहमदनगर येथे आई-वडिलांकडे ती गेली होती. 12 जून रोजी नऱ्हे येथे मैत्रिणीला भेटायला आली होती. यानंतर ती मैत्रिणीला सिंहगड येथे जाते, असे सांगून गेली. त्यानंतर ती पुन्हा परतलीच नाही. तिला शोधण्यात यश न आल्याने 15 जून रोजी सिंहगड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
दरम्यान रविवारी तिचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावाच्या हद्दीतील डोंगरकपारीत सापडला. तिच्या शरीराचे लचके तोडण्यात आले होते. राजगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी तिचा मृतदेह सापडला असल्याची माहिती दिली.