पाटण,(गुजरात) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला असून, कोणत्याही पक्षाच्या नेत्याला परदेशात जाऊन तेथे स्वत:च्या देशावर टीका करणे शोभत नाही असे म्हटले आहे. शाह यांनी गांधींवर परदेशात जाऊन भारताची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी त्यांच्या पूर्वजांकडून शिकण्याची गरज आहे असा सल्लाही अमित शहा यांनी राहुल गांधी यांना दिला आहे.
नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर टीका केली होती. त्या संबंधात अमित शहा यांनी म्हटले आहे की, कोणत्याही देशभक्त व्यक्तीने भारतातील राजकारणावर देशातच चर्चा करावी, कोणत्याही पक्षाच्या नेत्याने परदेशात जाऊन देशाच्या राजकारणावर चर्चा करणे आणि देशाचा निषेध करणे हे शोभनीय नाही.
गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील सिद्धपूर शहरात मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. मोदी सरकारच्या काळात देशात मोठे बदल झाले, असे ते म्हणाले. पण कॉंग्रेस पक्ष भारतविरोधी गोष्टींबद्दल बोलणे थांबवत नाही. राहुल बाबा उन्हाळ्यामुळे सुट्टीवर परदेशात जात आहेत. ते परदेशात देशाची मानहानी करतात. मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की त्यांनी त्यांच्या पूर्वजांकडून शिकावे, असे ते म्हणाले.