WTC23 Final : भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आमनेसामने आहेत. बुधवारपासून (7 जून) सुरू झालेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून ऑस्ट्रेलियाने तीन गड्यांच्या मोबदल्यात 327 धावा केल्या आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील सामन्यातील पहिला दिवस भारतासाठी काही खास नव्हता. पहिल्या दिवसावर पूर्णपणे ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व पाहायला मिळाले. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या केवळ तीन विकेट घेता आल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर तीन गड्यांच्या मोबदल्यात 327 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ट्रॅव्हिस हेड 146* (156) तर स्टीव्ह स्मिथ 95*(227) धावांवर खेळत होते.
Stumps on Day 1 🏏
Indian bowlers were made to toil as Travis Head and Steve Smith put Australia in control 👊
Follow the #WTC23 Final 👉 https://t.co/wJHUyVnX0r pic.twitter.com/29K7u7rcPR
— ICC (@ICC) June 7, 2023
ट्रॅव्हिस हेडने आपल्या खेळीत 22 चौकार आणि 1 षटकार लगावले आहेत तर स्टीव्ह स्मिथच्या खेळीत 14 चौकाराचा समावेश आहे. हेड आणि स्मिथने चौथ्या विकेटसाठी 251 धावांची भागीदारी केली.
मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला बाद करून टीम इंडियाला सुरुवातीचे यश मिळवून दिले. ख्वाजा खाते उघडू शकला नाही आणि यष्टिरक्षक केएस भरतच्या हाती झेलबाद झाला. ख्वाजानंतर क्रीजवर आलेल्या मार्निश लबुशेनने डेव्हिड वॉर्नरसह संघाच्या डावाचे नेतृत्व केले. लबुशेन आणि वॉर्नर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. वॉर्नर 60 चेंडूत 43 धावा करून बाद झाला. शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर भरतने त्याचा झेल घेतला.
उपाहारानंतर लबुशेनला मोहम्मद शमीने क्लीन बोल्ड केले. त्याला 62 चेंडूत केवळ 26 धावा करता आल्या. आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पुनरागमन करण्याकडे टीम इंडियाचे लक्ष असेल आणि ऑस्ट्रेलियन संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखावे लागेल.