भुईंज -भुईंजसह सातारा आणि जावली तालुक्यात घरफोडी आणि वाहन चोऱ्या करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून सहा लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन लाख तीस हजार रुपये किमतीचे सोने- चांदीचे दागिने आणि चार लाख रुपये किमतीच्या आठ मोटरसायकल त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
याबाबतची माहिती अशी, की 24 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी साडेसहा या दरम्यान शुभांगी संजय साबळे (रा. उडतरे, ता. वाई) या शेतात गेल्या असताना अज्ञात चोरट्याने खिडकीतील घराची चावी घेऊन कपाटातील दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. त्याप्रमाणे भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत तपासाचे आदेश मिळाल्यावर भुईंज पोलिसांचे पथक सतर्क झाले होते.
अधिक तपासामध्ये त्यांना ही चोरी गावातील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार योगेश संदीप बाबर (वय 19 रा. उडतरे) याने केल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानंतर त्याला याप्रकरणी अटक करून सखोल चौकशी केली असता त्याने संबंधित गुन्हा केल्याचे कबूल केले. तसेच सोने चांदीचे दागिने त्याचा मामा रमेश दिवाकर दुदुस्कर (वय 40, रा. सोनगाव, ता. सातारा) यांच्याकडे विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. या प्रकरणात त्यालाही अटक करण्यात आली.
त्याच्याकडे तपास केला असता दोन्ही संशयितांकडून भुईंज पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी, वाई पोलीस स्टेशनमध्ये एक व शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरीचे चार गुन्हे उघड झाले आहेत. या गुन्ह्यातील आणखी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमध्ये सहा लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घरफोडी प्रकरणांमध्ये चार तोळे पाच ग्रॅम सोन्याचे दागिने, चाळीस ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा दोन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल आणि चोरीला गेलेल्या आठ मोटरसायकलींची अंदाजे किंमत चार लाख रुपये असा एकुण सहा लाख 30 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या कारवाईमध्ये भुईज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गरजे, उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे, पोलीस अमलदार बापूराव धायगुडे, जितेंद्र इंगोळकर, अनंता भोसले, शंकर घाडगे, रविराज वर्णेकर, सागर मोहिते, सोमनाथ बल्लाळ, सचिन नलावडे यांनी भाग घेतला होता.