नवी दिल्ली – रस्ता सुरक्षेचे नियम न पाळून आपला जीव धोक्यात घालणाऱ्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ग्राहक संरक्षण नियामक ने कार सीट बेल्ट, अलार्म क्लिप आणि इतर अशा उत्पादनांची विक्री त्वरित थांबवण्यास सांगितले आहे. Amazon, Flipkart, Snapdeal यासह एकूण पाच प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना शुक्रवारी ग्राहक संरक्षण नियामक बोर्डाने सीट बेल्ट अलार्म थांबवणाऱ्या उत्पादनांची विक्री त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यापूर्वी अशा उत्पादनांच्या खुल्या विक्रीबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि या संदर्भात ग्राहक संरक्षण नियामक बोर्डाला पत्र देखील पाठवले होते. त्यामुळे मंत्रालयाच्या पत्रानंतर या संदर्भात कारवाई करण्यात आली असून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
निष्काळजीपणामुळे गेले हजारो लोकांचे जीव…
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये रस्ते अपघातात सीट बेल्ट न लावल्यामुळे 16 हजारांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला. सरकारने सांगितले की, अशा अपघातांना बळी पडणाऱ्यांपैकी एक तृतीयांश हे 18 ते 45 वयोगटातील तरुण आहेत.
दरम्यान, नवीन गाड्यांना सीट बेल्ट अलार्म प्रदान केले जातात जे की प्रवाशांनी सीट बेल्ट घातल्यानंतरच बंद होतात. परंतु कार सीट बेल्ट अलार्म क्लिप मुळे लोक सीट बेल्टचा वापर करणे टाळतात म्हणून त्यांना दुर्घटनांना सामोरे जावे लागते.