वाराणसी – ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग आणि वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत. शुक्रवारी न्यायमूर्ती अरविंद कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) शिवलिंगाच्या वरच्या भागाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. मात्र, दहा ग्रॅमपेक्षा जास्त भाग घेतला जाऊ नये, असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे.
हे शिवलिंग 16 मे 2022 रोजी ज्ञानवापी परिसरामधील वुजुखानामध्ये सापडले होते. तसेच वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांनी कार्बन डेटिंगचा अर्ज यापूर्वी फेटाळला होता. सापडलेले कथित शिवलिंग किती जुने आहे, ते प्रत्यक्षात शिवलिंग आहे की आणखी काही? हे वैज्ञानिक सर्वेक्षणाद्वारे तपासावे लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी एएसआयने गुरुवारी सीलबंद कव्हरमध्ये आपला अहवाल न्यायालयात सादर केला होता.
“शिवलिंगाला खराब न करता कार्बन डेटिंग करता येईल का? असे यापूर्वी, 20 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) विचारले होते.याचिकाकर्ते अधिवक्ता विष्णू शंकर जैन यावेळी म्हणाले की, “या तपासातून शिवलिंग नेमके कोणत्या काळातील आहे हे कळेल, परंतु अद्यापपर्यंत एएसआयने उच्च न्यायालयात कोणतेही उत्तर दाखल केलेले नाही.’