बंगळूरू – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात जोरदार शाब्दीक युध्द सुरू असतानाच आता भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केलेल्या एका दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आपण प्रियंका गांधी यांना अमेठित नमाज पठण करताना पाहिले असल्याचा दावा इराणी यांनी केला आहे.
नमाज पडणारी व्यक्ती मूर्तीपूजा करू शकत नाही. तुम्ही इस्लामच्या कोणत्याही अभ्यासकला विचारले तर ते असेच सांगतील. त्यामुळेच ही मंडळी राम मंदिराला विरोध करतात असेही इराणी यांनी म्हटले आहे. कर्नाटकात अगोदरच बजरंग बलीवरून वातावरण तापले असताना इराणी यांनी आता हा नमाज पठणाचा मुद्दा पुढे केल्यामुळे दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.
इराणी म्हणाल्या की कॉंग्रेसने अगोदर हिंदूंच्या संघटनेची तुलना एका दहशतवादी संघटनेशी केली. पीएफआय ही संघटना देशाचा विनाश करण्यासाठी प्रशिक्षण देण्याच्या कामात गुंतलेली आहे. लोकांना दहशतवादी बनवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो आहे. ही संघटना दहशतवादाच्या माध्यमातून हिंदूंची हत्या करते. असे असतानाही जी संघटना आयुष्यभर हिंदू समुदायाच्या रक्षणाचे काम करत आली आहे त्या संघटनेची आणि हिंदू समुदायाची तुलना तुम्ही पीएफआयशी करतात अशी विचारणा करून त्यांनी कॉंग्रेसवर तोफ डागली.
त्या म्हणाल्या की कॉंग्रेस पक्ष हिंदू विरोधी आहे हे आम्हाला ठाउक आहे. मात्र त्यांचा हा विरोध जाहीरनाम्यातही उमटेल हे आता पाहायला मिळाले. जे लोक बजरंग बलीचे नाव घेतल्यामुळे नाराज होतात ते लोक हिंदू धर्मावर विश्वास असणाऱ्यांवर किती नाराज होत असतील याचा तुम्ही विचार करा असे आवाहन इराणींनी केले. आपण स्वत: कॉंग्रेसच्या नेतृत्वाला अमेठित नमाज पठण करताना पाहिले आहे. ज्यांची इस्लाममध्ये विशेष रूची असते ते मूर्तीपूजक असूच शकत नाही. त्यामुळे गांधी कुटुंब राम मंदिराला विरोध करते अशी टीका इराणी यांनी केली.