पुणे-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उन्हाळी सत्र परीक्षा घेण्याबाबतची तयारी करण्यासाठी महाविवद्यालयांना कामाला लावले आहे. अंतिम वर्ष वगळता उर्वरित परीक्षांची बहुसंख्य कामे महाविद्यालय स्तरावरच पूर्ण करावी लागणार आहे. यामध्ये प्रामुख्याने उत्तरपत्रिका तपासणीचे कामकाज हे संबंधित महाविद्यालयातच होणार आहे. त्यामुळे निकाल वेळेत लागण्यास मदत होणार आहे.
उन्हाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, संचालक यांनी परीक्षार्थीच्या बैठक व्यवस्थेचे नियोजन करावे लागणार आहे. परीक्षा केंद्रावर दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता तळमजल्यावर विशेष खोलीची व्यवस्ता करावी लागणार आहे. आवश्यकतेनुसार त्यांना लेखनिकही उपलब्ध करुन द्यावे लागणार आहे.
परीक्षे दरम्यान विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार परीक्षेच्या आयोजनासाठी संबंधित महाविद्यालयास परीक्षा केंद्र म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. भरारी सदस्य पथक, वरिष्ठ बाह्य पर्यवेक्षक, स्थायी निरीक्षक असे आदेश प्राप्त होणाऱ्या प्राध्यापकांना दिलेल्या कालावधीसाठी तात्काळ कार्यमुक्त करणे आवश्यक आहे, अशा सूचना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे यांनी जारी केल्या आहेत.