श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील पिचनाड माछिल भागात ही चकमक झाली.
त्यात दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या परिसरात शोधमोहीम अजूनही सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. ठार झालेले दहशतवादी नेमक्या कोणत्या गटाचे आहेत याची माहिती घेतली जात आहे. त्यांची ओळख पटवण्याचे काम ही सुरू आहे.
पिचनाड माछिल भागात काही दहशतवादी आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तेथे नाकेबंदी करून त्यांचा खात्मा केला. परंतु त्यांचे काही साथीदार अजूनही या भागात लपले असल्याची माहिती असून त्यादृष्टीने आता तेथे शोध मोहीम सुरू आहे.