बीड – अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारच, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. ते बीडमध्ये बोलत होते. एकीकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेने वेग घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर केलेले हे दावे चर्चेत आहेत.
विशेष म्हणजे कालच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील यांचे नाव घेतले होते. त्यानंतर आता अमोल मिटकरी यांनी अजित पवारांचे नाव घेतले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधले मतभेदही चव्हाट्यावर येत असल्याच्या चर्चांना उधाण येत आहे.
मिटकरी म्हणाले की, अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारच. त्यासाठी फक्त “वेट अँड वॉच’ची भूमिका घ्या. अमित शहांनी सुद्धा अजित पवारांचे कौतुक केले. महाराष्ट्राचे राजकारण सांभाळेल असा अजित पवारांसारखा दुसरा नेता नसल्याचे अमित शहा स्वतः म्हणालेत, याची आठवणही मिटकरींनी करून दिली. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्तीच्या रजेवर गेल्याचा टोलाही त्यांनी हाणला. मात्र, याच्याशी हा संदर्भ जोडू नका. महाविकास आघाडीचे सरकार येणाऱ्या काळात येईल. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावे- कोल्हे
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील यांचे नाव घेतले. ते म्हणाले की, जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसजवळ जयंत पाटलांच्या ताकदीचा दुसरा उमेदवार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते.
कोल्हे यांच्या या वक्तव्यालाच मिटकरी यांनी हे उत्तर दिले का? असा सवालही आता केला जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील दिग्गज नेत्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय भूमिका घेणार, याचीही उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये दिसते आहे.