अहमदनगर – राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुख्यमंत्रीच काय या पदापेक्षा पुढे जावे. माझी छाती चिरून दाखवली, तर माझ्या हृदयात तेच दिसतील, अशा शब्दांत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायउतार होणार असल्याच्या चर्चा आहेत. त्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे-पाटील मुख्यमंत्री होणार का, असा प्रश्न विचारला असता अब्दुल सत्तार यांनी आपल्या शैलीत चौफेर फटकेबाजी केली. सत्तार यावेळी म्हणाले की, कदाचित मी एखादा हनुमान महाराजांसारखा त्यांचा एखादा भक्त असतो, तर छाती चिरून दाखवले असते की, माझ्या ह्रदयात राधाकृष्ण विखे-पाटील आहेत. आज एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना महसूल मंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. महसूलमध्ये अत्याधुनिक बदल होऊ लागल्याचेही त्यांनी सांगितले.
अडचणीचे प्रश्न नको…
सत्तार पुढे म्हणाले की, मी ही अनेक दिवसांपासून राजकारण करतो आहे. राधाकृष्ण विखे – पाटील मराठा नेते आहेत. एकनाथ शिंदे सुद्धा मराठा नेते आहेत. हे सर्व लोकप्रिय मराठा नेते माझ्या हृदयात आहेत. कोणाला वाटणार नाही, आपल्या मित्राने काही तरी व्हावे? त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या पुढे जाऊन यावे. मात्र, ते अडचणीत येतील असे प्रश्न विचारू नका, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.