राजगुरूनगर -गाव वेताळे (ता. खेड) येथील सिद्धेश्वर महारांजाच्या यात्रेनिमित्ताने शर्यतीत 180 बैलगाडा धावले. यात घाटाचा राजाचा मान सरपंच वर्षा मनोहर बच्चे यांनी पटकावला. दरम्यान, मुलांप्रमाणे मुलींच्या कुस्ती स्पर्धेने कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
बैलगाडा शर्यातीत फायनलसाठी 11.20 सेकंदात वाडा गावचे नीलेश घनवट यांच्या बैलगाड्यांनी बाजी मारत मोटारसायकल जिंकली. 11.61 सेकंदात राजगुरूनगरच्या स्व. सचिन सूर्यकांत भंडलकर यांनी, वाळदचे दामुशेठ लांडगे यांनी, तर मावळ तालुक्यातील कडधे गावचे प्रवीण धावडे यांच्या बैलगाडाने अनुक्रमे द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांक पटकावला.
फळीफोड बैलगाडा शर्यतीत जुन्नर तालुक्यातील आर्वीतील नानासाहेब गुळवे, मोहकलचे बबन बेंडुरे, दोंदे येथील भैरवनाथ बैलगाडा संघटनेने, तर कडूसचे महेंद्र गोरक्ष डागंले यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांक पटकावला. बक्षीस वितरण सहायक निबंधक हरिश्चंद्र काबंळे, दिनेश कड आदींसह ग्रामस्थ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात मुलींमध्ये त्रिशा काळे (ढाकाळे) आणि सानिया महानवर (बारामती) यांची कुस्ती आणि सहभागी झालेल्या पैलवान मुलींच्या कुस्त्यांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद देत रोख रक्कमेची बक्षिसे दिली. राष्ट्रीय विजेत पैलवान रामा सुरवडकर, शुभम गवळी, पवन माने, संतोष राजपुत्र, यशराज बोंबले,
सक्षम मुळूक, आयुष दातखिळे, संकेत माने, वैभव मेदनकर, अमोल माने यांनी कुस्त्या केल्या. या यात्रेचे संयोजन साहेबराव बोंबले, बंडोपंत बोंबले, विठ्ठल बोंबले, बी. कदम, बाबाजी वाळुंज, उपसरपंच योगेश बोंबले, ऍड. प्रवीण बोंबले, पिंट्या बोंबले, सयाजी पाटील, दिनेश शिंदे, सुरेश वाळुंज, एस. बोंबले, देविदास बोंबले, शंकर पाटील, ज्ञानेश्वर घाडगे, हरिभाऊ वाळुंज, प्रकाश बोंबले, गुलाब बोंबले, काळुराम वाळुंज, नथुराम बोंबले, जय बोंबले आदींनी केले.
चांदीची गदा शेखर याने पटकावला
आखाड्यात अनिकेत शेखर आणि तुळशिराम मोरे यांच्यात झालेल्या आकर्षक चितपट कुस्तीत चांदीचा गदा मिळवण्याचा मान अनिकेत शेखर याने पटकावला.