नवी दिल्ली: जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याचा घोटाळा केल्याप्रकरणी बिहार राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर ईडीने छापा टाकला. एनसीआर, पटना, रांची आणि मुंबईसह वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. ईडीच्या या कारवाईनंतर लालू प्रसाद यादव यांचा पारा चांगलाच चढला आहे. याविषयी बोलताना लालू प्रसाद यादव यांनी भाजप आणि ईडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजपा आणि ईडीवर संतापलेल्या लालू प्रसाद यादव यांनी ट्विटच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये “आम्ही आणीबाणीचा भयानक काळही पाहिला आहे. आम्ही त्यातही लढलो. आज माझ्या मुली, नातवंडं आणि गर्भवती सून यांना भाजप ईडीने निराधार सूडाच्या खटल्यात 15 तास बसायला लावले. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन भाजप आमच्याशी राजकीय लढाई लढणार का?”असा सवाल करत केंद्रावर निशाणा साधला आहे.
हमने आपातकाल का काला दौर भी देखा है। हमने वह लड़ाई भी लड़ी थी। आधारहीन प्रतिशोधात्मक मामलों में आज मेरी बेटियों, नन्हें-मुन्ने नातियों और गर्भवती पुत्रवधु को भाजपाई ED ने 15 घंटों से बैठा रखा है। क्या इतने निम्नस्तर पर उतर कर बीजेपी हमसे राजनीतिक लड़ाई लड़ेंगी?
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) March 10, 2023
पुढे बोलताना त्यांनी “संघ आणि भाजपाविरुद्ध माझा वैचारिक लढा आहे आणि राहील. मी त्यांच्यापुढे कधीही झुकलो नाही आणि तुमच्या राजकारणापुढे माझ्या कुटुंबातील आणि पक्षातील कोणीही झुकणार नाही.”असेदेखील म्हटले आहे.
लालू प्रसाद यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी शुक्रवारी आपला भाऊ तेजस्वी यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापा टाकल्याबद्दल ईडीवर निशाणा साधला. एका ट्विटमध्ये त्यांनी ईडीच्या छाप्याबद्दल भारतीय जनता पक्षावर (भाजप) टीकाही केली. आचार्य यांनी ट्विट केले की, गरोदर महिला आणि मुलांना त्रास दिल्याबद्दल तुम्हाला लाज वाटायला हवी.
अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधत त्यांनी ट्विटरवर लिहिले की, असा अन्याय आम्ही लक्षात ठेवू. सर्व काही लक्षात राहील. त्या लहान मुलांचे काय गुन्हे आहेत? तुम्ही त्यांचा छळ का करत आहात? शुक्रवारी सकाळपासून त्यांचा छळ सुरू झाला. तुम्हाला योग्य वेळी योग्य उत्तर मिळेल.