पुणे – कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ सोमवारी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी सोमवारी जोरदार प्रचार केला. पूर्ण दिवसभर मेळावे, प्रचारफेऱ्या तसेच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. त्यामुळे मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले होते.
या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक पेठा असून सोमवारी जवळपास सर्व बाजारपेठा बंद असतात. त्यामुळे उमेदवारांनी नागरिकांना घरोघरी जाऊन भेटण्याची संधी साधली.
महायुतीच्या उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी सोमवारी दिवसभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे बैठका तसेच कार्यकर्ता मेळावा घेतला. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री रवींद्र चव्हाण, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी कार्यकर्ता बैठका, मेळावे घेतले. तसेच प्रचार फेरीत सहभागही घेतला.
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी प्रचार फेरी तसेच मेळावा घेतला. तर कॉंग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, निवडणूक निरीक्षक संग्राम थोपटे, आमदार प्रणिती शिंदे यांनी मेळावे तसेच बैठका घेत प्रचारात रंगत भरली.