मुंबई- मराठी टेलिव्हिजन वरील लोकप्रिय स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून रसिकांच्या मनात घर करणारा अभिनेता ‘शंतनू मोघे’ आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या आगामी “रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटातून शंतनू पुन्हा एकदा सिनेरसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
रावरंभा या चित्रपटात अभिनेता ‘शंतनू मोघे’ पुन्हा एकदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. स्वतः अभिनेत्यानं याबद्दल खुलासा केला आहे. नुकतंच ‘रावरंभा’ चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘रावरंभा’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुप जगदाळे यांनी सांभाळली आहे.
दरम्यान, आपल्या भूमिकेविषयी बोलताना शंतनू मोघे म्हणाला की, “मी छोटया पडद्यावर स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं होतं. या भूमिकेचं गारुड आजही प्रेक्षकांच्या मनात असताना आता मोठया पडद्यावरही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळाल्याचा आनंद आहे..’ अशी भावना अभिनेता शंतनू मोघेनं व्यक्त केली आहे.
इतिहासाच्या पानांमध्ये रावरंभा ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे. ही प्रेमकहाणीच रावरंभा या चित्रपटातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येत आहे. सातारा जिल्ह्यात चित्रित होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे. दरम्यान, शांतनू मोघेच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास, स्वराज्य जननी जिजामाता आणि स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकांमध्ये शांतनू मोघेनं काम केलं. तसेच त्यानं कॅरी ऑन मराठा आणि शूर आम्ही सरदार या चित्रपटांमध्ये देखील त्यानं महत्वाची भूमिका साकारली आहे.