कोल्हापूर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती असून, संपूर्ण राज्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव आनंदात साजरा करण्यात येत आहे. ठिकठिकाणी शिव जयंतीनिमित्त विविध कर्यक्रमाचे आयोजन केल्याचे पाहायला मिळत आहे. अशात एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. शिवज्योत आणताना झालेल्या एका अपघातात दोन तरुणांचा आपले प्राण गमवावे लागले आहेत.
शिवजयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर पन्हाळा रोडवर शिवज्योत नेण्यासाठी युवकांची मोठी गर्दी झाली होती. या रस्त्यावर रजपुतवाडी गावाजवळ दोन मोटरसायकलची धडक झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अक्षय पाडळकर आणि संतोष पाटील अशी मयत तरुणांची नावं आहेत.
शिवनेरीवर पार पडला शासकीय कार्यक्रम
छत्रपतींची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवरही मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला नमन करण्यासाठी लाखो शिवप्रेमी आज शिवनेरीवर दाखल झाले आहेत.दरम्यान, आजच्या या दिमाखदार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बाळ शिवाजींना पाळण्यात घालण्यात आले.