पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा ही 28 लाख रुपये होती. आता मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने ही मर्यादा वाढविली आहे. त्यानुसार कसबा पेठ व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना आता 40 लाख रुपये इतका खर्च करता येणार आहे. मतदारांची वाढलेली संख्या, वाढती महागाई यामुळे हा निर्णय घेण्यात आल आहे.
निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेण्यात आला होता. त्यामुळे उमेदवारांना लोकसभेसाठी आता 95 लाख रुपये खर्च करता येणार आहेत. यापूर्वी ही मर्यादा 70 लाख रुपये होती. हा निर्णय महाराष्ट्र, उत्तर प्रदेश तसेच इतर मोठ्या राज्यांसाठी लागू असेल.
गेल्या काही वर्षांत देशातील प्रत्येक लोकसभा मतदार संघातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच महागाईतही वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवावी, अशी मागणी अनेक राजकीय पक्षांनी केली होती.
गेल्या वर्षी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये ही वाढवलेली खर्च मर्यादा लागू करण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा नियम लागू होत आहे.
निवडणूक आयोगाची आचारसंहिता असते, त्यानुसार प्रत्येक उमेदवाराला हा खर्च करता येतो, अशी माहिते निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.